सामाजिक

तोराळी बंधाऱ्यातून पाण्याचे ‘कारंजे’ ; पाठबावधारे खात्याचा कारभार उघड्यावर!


गंजलेल्या दरवाज्यातून हजारो लिटर पाणी जातेय वाया; कंत्राटदारावर केस नोंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी!

 

तोराळी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

‘यंदा पावसाने हात दिला, दुष्काळ विशाल झाला’ त्यात असलेले पाणीही व्यवस्थित साठवून ठेवणे सबंधित खात्याला जमत नसेल तर तर शेतकऱ्यांनी करावे तरी काय? असाच प्रश्न तोराळी (ता. खानापूर) येथील शेतकऱ्यांना पडला आहे. तालुक्याची गंगा समजल्या जाणाऱ्या मलप्रभेला पाण्याची पातळी कमालीची खालावली असून, आणखी दोनच महिने पाणी पुरणार असून, संपूर्ण उन्हाळा कोरडाठाक जाण्याची भीती आतापासूनच जाणवू लागली आहे. त्यात तोराळी येथील बंधाऱ्याचे पाणी अडविण्याचे काम पूर्णपणे ‘फेल ‘ झाले असून, गंजलेल्या दरवाजे बसविल्याने त्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सर्वच दरवाजातून पाण्याचे कारंजे निर्माण झाल्याने पाटबंधारे खात्याच्या खात्याच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत, त्वरित याची दुरुस्ती न केल्यास पाटबंधारे खात्याच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

व्यवस्थित नवीन दरवाजे बसवण्याची गरज!

दहा वर्षांहून अधिक काळ झाल्याने बंधाऱ्याचे दरवाजे गंजले असून, त्याला ठिकठिकाणी भोके पडली आहेत, त्यामुळे पुरेपूर पाणी साचणे शक्य नाही, पाणी वाया जाते. असा प्रकार गेल्या दहा वर्षांपासून सुरूच आहे. दरवर्षी पाणी अडवण्याचे काम फेल होते, शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्याची दुरुस्ती होत असेल तर पाटबंधारे खात्याचे अधिकारी कशासाठी? आहेत. नावापुरते? असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे. तात्काळ नवीन दरवाजे व्यवस्थितपणे पुन्हा बसवून द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

 

अधिकाऱ्यांची चैनी; सरकारी निधी वाया!

एकीकडे शेतकऱ्यांच्या विविध कामांसाठी कोटींच्या निधीची सरकारकडून खैरात केली जाते, मात्र, त्याचा त्याप्रमाणे उपयोग होतो काय? हा खरच चिंतनाचा विषय असतांनाच, शेतकऱ्यांचे काय पण,  अधिकाऱ्यांची चैनी मात्र, ठरलेलीच! त्यामुळे लाखोंचा सरकारी निधी वाया जात आहे, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

 

प्रतिक्रिया – 

आधीच पाऊस लांबला ,त्यात असलेलेही पाणी व्यवस्थित नाही साठवले तर आम्हीं काय करावे? अधिक वेळ न घालता पुन्हा सुरळीत दरवाजे बसवा अन्यथा, तीव्र आंदोलन हाती घ्यावे लागेल!

– व्यंकट पाटील, सामाजिक कार्यकर्ते तोराळी!

 

या बंधाऱ्यावरच आमची शेती अवलंबून असून, भविष्यात पाणीच उरले नाही तर शेती वाळून जाणार आहे, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, नव्याने दरवाजे बसवा, नाही तर पाटबंधारे खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा मार्ग धरावा लागेल.

– पुंडलिक ल. पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य तोराळी.

 काम व्यवस्थित करता येत नसेल तर अशा कंत्राटदारांना काम कशाला देता? हा आमचा प्रश्न आहे. तात्काळ दरवाजांची दुरुस्ती करून, संपूर्ण पाणी साठवावे, अन्यथा भविष्यात होणाऱ्या नुकसानीला सरकार जबाबदार असेल?

– आकाश का. पाटील, युवा नेता तोराळी! 

 

 

 

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *