सामाजिक

प्रबोधन’मुळे सामाजिक विचारांची पेरणी!


दिवाळी अंकातून राजकारणापलीकडची वैचारिक दिवाळी , उपस्थित मान्यवरांचे मत; मराठी भाषा संवर्धनाचा एकमुखी सूर : खानापुरात ‘प्रबोधन’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

 

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

वाचन माणसाला विचारांची श्रीमंती देते, दृष्टिकोन व्यापक करते आणि व्यक्तिमत्त्वाला प्रगल्भतेची किनार लाभवून देते. काळाच्या प्रवाहात इतर भाषा आत्मसात करणे आवश्यक असले, तरी मातृभाषेचा अभिमान आणि तिचे जतन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. मात्र, मातृभाषेतील शिक्षणाचा प्रसार करायचा असेल, तर सर्वप्रथम पालकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, प्रबोधन दिवाळी अंकामुळे याला अधिक बळ मिळणार असून, या अंकामुळे सामाजिक विचारांची पेरणी होणार असल्याचेही बोलतांना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते.

 

सर्वपक्षीय मान्यवरांचे विचार…

दिवाळीच्या फराळातील गोडव्याला वैचारिक चिंतनाची जोड लाभावी, अशीच या सोहळ्याची अनुभूती होती. रविवारी सायंकाळी रंगलेली दोन तासांची ही मैफल केवळ दिवाळी अंकाच्या प्रकाशनापुरती मर्यादित न राहता तालुक्याच्या भाषा, साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक भवितव्याचा वेध घेणारी ठरली. विशेष म्हणजे भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या प्रश्नावर एकाच व्यासपीठावरून मांडलेली मते या कार्यक्रमाचे खरे वैशिष्ट्य ठरले. राजकारणाच्या पलीकडेही समाजहिताचे अनेक विषय असून त्यावर सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे विचारमंथन करण्याची गरज असल्याचा विधायक संदेश या सोहळ्याने दिला.

यावेळी ॲड. अभिजित सरदेसाई यांनी खानापूर तालुक्याला लेखणी आणि मराठी साहित्याचा समृद्ध वारसा लाभल्याचे सांगितले. महाराष्ट्रातही लौकिक मिळविलेली अनेक नियतकालिके आणि साहित्यकृती खानापूरमधून प्रकाशित झाल्याच्या आठवणी त्यांनी जागवल्या.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान करीत असलेले कार्य अनमोल असल्याचे सांगून या चळवळीला सर्वांनी पाठबळ देण्याची गरज व्यक्त केली.

भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी म्हणाले, कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेचा द्वेष करायला शिकवत नाही. मी कन्नड भाषिक असलो, तरी मराठी संतसाहित्याची समृद्ध परंपरा आणि भाषेतील गोडवा मला नेहमीच भावतो. भाषांमधील परस्पर आदर आणि साहित्यिक देवाणघेवाण अधिक बळकट झाली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी मराठी शाळा टिकवायच्या असतील, तर वाचन चळवळ जिवंत ठेवणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड ईश्वर घाडी यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आता केवळ चर्चा न करता ठोस कृती करण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले. दिवाळी अंकामुळे स्थानिक साहित्यिकांसह नवोदित लेखकांना आपल्या लेखनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात नारायण कापोलकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मराठी शाळा आणि वाचनसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शाळांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना पुरेशा संख्येने विद्यार्थी मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक पालकाने पुढाकार घेऊन आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचा निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव आबासाहेब दळवी, पंचहमी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार, युवा काँग्रेसचे नेते भैरू पाटील, भाजपचे सचिव मल्लाप्पा मारिहाळ, पत्रकार विवेक गिरी, मुख्याध्यापक जयवंत पाटील, विनायक मुतगेकर, पिराजी कुराडे, मरू पाटील, गजानन पाटील, ईश्वर बोबाटे, हणमंत सुतार, बाबाजी पाटील, ऋतिक कुंभार, शुभम कांबळे आदी उपस्थित होते. प्रल्हाद मादार यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे सचिव वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *