उद्योगराजकीय

जांबोटी zp; तीन बाबू’मुळे कोण कोण बेकाबू?


  भाजपकडून मारुती पाटील यांना तिकीट फिक्स’ची जोरात चर्चा ; सध्या खानापुरात दिसणारे तीन ‘गटवाद’ भाजप श्रेष्ठी थोपवणार का? ; काहीं जण म्हणतात, मीच शंभर टक्के! 

 

कारण राजकारण – 1

 

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

आधीच पाच वर्षांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे झाली, त्यामुळे संपूर्ण राज्यातील विकास खुंटलेला! यंदा सरकारने गेल्या या महिन्यात जिल्हा आणि तालुका पंचायत आरक्षण जाहीर केले असले तरी तेही अजून तळ्यात – मळ्यात दिसू लागले आहे. याचे कारण असे की, निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली, असे चित्र असतांना आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून ढीगभर इच्छुक व्यासपीठावर नमस्कार करतांना दिसत आहेत. काही जण तर माझे तिकीट शंभर टक्के फिक्स असून, माझ्याकडे त्या नेत्याचे वजन आहे, त्याचे वचन आहे अशा पुशाऱ्या मारतांना दिसत आहेत. पण, तालुका आणि जांबोटी भागातून एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे भाजपचे जुने कार्यकर्ते, तालुका भाजपचे प्रधान सचिव राहिलेले मारुती देवापा पाटील , कालमणी येथील माजी ग्राम पंचायत सदस्य तसेच भागातील प्रभावी व्यक्तिमत्व बाबूराव भरणकर आणि एकवेळ जांबोटी भागाची सत्ता भोगलेले माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांचीच. या तिघांमुळे जिल्हा पंचायत निवडणुकीमुळे बराच परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे या तिघांमुळे कोण कोण बेकाबू’ आहेत अशीच चर्चा रंगली आहे.  मारुती पाटील यांनी भाजपचे जुने नेते आणि तालुका प्रधान सचिव राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनाच तिकीट फायनल असल्याचे बोलले जात आहे, तर माजी ग्राम पंचायत सदस्य बाबूराव भरणकर यांचाही जांबोटी भागात अफाट परिचय असल्याने प्रत्येक गावातून ते चांगली मते खेचू शकतात असे भरणकर यांचे वजन आहे. तर बाबुराव देसाई यांनी एकवेळ जिल्हा पंचायत सदस्य राहिलेले असून, त्यांनी बऱ्यापैकी विकास साधला आहे, शिवाय त्यांचे जुने कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत, शिवाय त्यांच्या पै -पाहुण्यांचा मोठा गोतावळा असल्याने तेही कमाल करू शकतात. त्यामुळे यांना उमेदवारी नाही मिळाली तर बराच फरक पडू शकतो अशी चर्चा आहे. मारुती पाटील यांच्या गावचे माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे यांच्यावेळी तसेच अनेकवेळा तालुका आणि जिल्हास्तरीय नेत्यांनी पाटील यांना तिकीट देण्याचे वचन दिले होते. त्याचीच पूर्तता यावेळी होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

मारुती पाटील हे भाजपचे जुने नेते असून, सुशिक्षित, अनुभवी तसेच मराठी आणि कन्नड भाषेचे उत्तम ज्ञान असणारे व्यक्तिमत्व आहे, शिवाय त्यांची जिल्हा आणि राज्यस्तरीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे मारुती पाटील यांचीच बाजू वरचढ दिसू लागली आहे.

 

तरुण पिढी आणि जुने नेते कार्यकर्ते पाटील यांच्या पाठीशी!

सध्याच्या घडीला मारुती पाटील यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून जांबोटी भागातील पक्षाचे तरुण आणि जुने कार्यकर्तेही आग्रही असल्याचे दिसत आहे. परवा एका ठिकाणी याविषयावर जोरदार चर्चा सुरू होते, असे लोकहित न्यूज चे प्रतिनिधींच्या निदर्शनास आले. त्यावरून जांबोटी भागातील पक्षातील फळी तसेच इतर नागरिकही पाटील यांनाच तिकीट मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करतांना दिसतात.

 

तीन बाबूंमुळे कोण कोण बेकाबू?

माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, आमटे पंचायतीवर ग्राम पंचायत सदस्य कालमनीतून निवडून येऊन उत्तम विकास साधणारे तसेच उत्तम जाणते व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे बाबुराव भरणकर, तसेच भाजपचे जुने नेते मारुती पाटील ऊर्फ बाबू यांनी इच्छुक असल्यामुळे इतर इच्छुकांनी त्यांची चांगलीच धास्ती घेतलेली दिसते. कारण, या तिघाही बांबूची कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे, त्यामुळे ते रिंगणात राहिले तर अनेकांची पळताभुई होऊ शकते हे मात्र नक्कीच! त्यामुळे या तिघा बाबूंमुळे कोण कोण बेकाबू? अशीच जोरदार चर्चा रंगली आहे..

 

 

भाजपमधून काहीं जण म्हणतात, माझे टिकीट शंभर टक्के! पण सध्या दिसणारे तीन गट थोपणार का?

जांबोटी भागात भाजपमध्ये जिल्हा पंचायतीसाठी ढीगभर जुने –  नवे कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत, त्यांना तालुका आणि जांबोटी भागातील काहीं नेते फूस देत तुलाच तिकिट देतो, माझे तिकडे वजन आहे, तूं तयार रहा, तुलाच देणार बघ अशी हमी पत्र देतांना दिसत आहेत, पण सध्या तालुक्यात भाजपमध्ये दिसणारे तीन गट थोपणार का?  मागच्यासारखी गटबाजी झाली तर, ‘माका नको, तुका नको घाल कुत्र्याक’ असे होऊ नव्हे म्हणजे झाले. याचे तात्पर्य असे की, गटबाजीमुळे विरोधी उमेदवारांचा फायदा होऊ शकतो.

 

माजी आमदार अरविंद पाटील यांच्याकडून उमेदवारांची चाचपणी का?

वर्षभरापूर्वीच समितीतून भाजपवाशी झालेले माजी आमदार तथा डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनीही आपल्या समर्थकांचे धार्मिक कार्यक्रमांच्या स्टेजवर उमेदवार म्हणुन प्रदर्शन करतांना दिसत आहेत अशी चर्चा जांबोटीत रंगली आहे. आधीच विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर आणि माजी आमदार अरविंद पाटील यांचे घोडे एकत्र पाणी पिताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे आमदार विठ्ठल हलगेकर यांचेही ढीगभर समर्थक रेस’मध्ये आहेत, पक्षाकडून तर एकच अधिकृत उमेदवारी मिळणार, त्यामुळे माजी आमदार कोणाला तिकीट देणार आणि विद्यमान आमदार कोणाला पोसणार? हा चिंतनाचा विषय आहे.

 

 

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *