सामाजिक

तयारी बिरभावी लक्ष्मी यात्रेची! 500 कोटींची बहुग्राम पाणी योजना अंतिम टप्यात!


पुढील वर्षी होणाऱ्या लक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदारांकडून विकासकामांचा सपाटा….

 

बीदरभावी: लोकहित न्यूज 

पुढील वर्षी होणाऱ्या बीदरभावी (ता. खानापूर) लक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून, यांमध्ये महत्त्वपूर्ण योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 500 कोटींच्या बहुग्राम पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेमुळे तब्बल 136 गावांना पाणी योजनेचा लाभ होणार आहे, तर बीदरभावीतील पाणी समस्या कायमची निकालात येणार आहे. लक्ष्मी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी आज (दि. 13) गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते , अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होते. तसेच या सभेला तालुका पंचायत अधिकारी  रमेश मेस्त्री, जत्रा कमिटीचे अध्यक्ष, सर्व सदस्य उपस्थित होते..

 

यावेळी आमदार हलगेकर यांच्या हस्ते गावातील नूतन रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच आमदार हलगेकर यांनी गावातील प्रत्येक गल्लीत जाऊन रस्त्यांची पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

कोणकोणत्या मुद्द्यांना आमदारांनी स्पर्श केला…

सभेत मार्गदर्शन करताना आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी जत्रेच्या नियोजनाबाबत आणि गावाच्या विकासाबाबत सविस्तर भूमिका मांडली:

पूर्वतयारीचे महत्त्व:

तालुक्यातील अनेक गावांत दर १२ वर्षांनी भरणाऱ्या जत्रांचे नियोजन आणि अडचणी आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. यात्रेच्या चार ते सहा महिने आधी सर्व पूर्वतयारी सभा घेतल्यास शासकीय कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करता येतात.

रस्ते आणि दळणवळण-

पूर्वी पावसाळ्यात चिखलामुळे बिदरभावी आणि तोपीनकट्टीचा संपर्क तुटायचा, मात्र आता आपण रस्ते जोडले आहेत. देवलत्ती ते बिदरभावी या मुख्य डांबरी रस्त्याचे काम हाती घेतले असून, तो पूर्ण झाल्यावर बेळगाव आणि परिसरासाठी थेट बससेवा सुरू होण्यास मदत होईल. तसेच पारिश्‍वाड ते बिदरभावी रस्ताही प्राधान्याने पूर्ण करू.

 

पाणीपुरवठा योजनेचा दिलासा

बहुग्राम योजनेअंतर्गत मलप्रभा नदीतून १३६ खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या ५०० कोटींच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील महिन्यात या योजनेची चाचणी होऊन मार्च महिन्यापर्यंत तिचे उद्घाटन होईल, ज्यामुळे बिदरभावीचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल. तोपर्यंत तात्पुरती सोय म्हणून जत्रेसाठी गावात तातडीने नवीन बोअरवेल मारून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.

 

वीजपुरवठा आणि निधी..

यात्रेच्या काळात वाढणारा वीजभार लक्षात घेता महावितरणला निवेदन देऊन जादा क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर (टीसी) बसवले जातील आणि जुने खांब बदलले जातील. तसेच रोजगार हमी योजनेतून (नरेगा) गावातील कामे करून निधीचा योग्य वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

सर्वांची एकजूट ठेवा…

जत्रा ही केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता गावाचा विकास आणि ग्रामस्थांची एकजूट वाढवणारी असावी. मंदिर रंगरंगोटी आणि इतर कामांसाठी आपण स्वतः वैयक्तिकरीत्या आर्थिक मदत करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

गावकऱ्यांच्या आमदारांकडे अनेक मागण्या…

यावेळी समस्त ग्रामस्थ आणि जत्रा उत्सव समितीच्या वतीने आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना विविध प्रलंबित समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश आहे:

रस्ते आणि पूल कामांना प्राधान्य...

देवलत्ती ते बिदरभावी व पारिश्‍वाड ते बिदरभावी रस्ता तयार करणे, तोपीनकट्टी ते बिदरभावी दरम्यानचा खराब झालेला पूल दुरुस्त करणे, अंकलगी रोडवरील २०० फूट कच्चा रस्ता पूर्ण करून पथदिवे बसवणे, गावाभोवतालची चक्कर लाईन सी.सी. करून रुंदीकरण करणे तसेच जुने खराब सी.सी. रस्ते व शेतवडीतील रस्ते करून देणे.

मंदिर विकास…

लक्ष्मी मंदिर दुरुस्ती व सुशोभीकरण करणे, मारुती मंदिर व विठ्ठल-रखुमाई मंदिर कळसाचे काम करणे, तसेच जैमकोट रोडवरील स्थळ देव व कलमेश्वर मंदिराकडे जाणारे प्रत्येकी २०० फूट लांबीचे रस्ते तयार करणे.

पाणी, वीज व इतर सुविधा

गावासाठी नियमित व मुबलक पाणीपुरवठा करणे, जुने वीज खांब व लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त करून नवीन घरांपर्यंत वीजजोडणी देणे, गटारांची दुरुस्ती व सांडपाणी व्यवस्थापन करणे आणि गावाच्या प्रवेशद्वारावर दर्शनी कमान उभी करणे.

या सभेला तालुका पंचायत अधिकारी रमेश मेस्त्री, तसेच कमिटीचे सर्व सदस्य, गावातील पंच कमिटी, जत्रा उत्सव समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *