वाढती महागाई, राज्य सरकार विरोधात; खानापुरात आज भाजपचे ‘बस रोको अस्त्र’ ! ‘!
वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त, सर्वच गोष्टींनी घेतली महागाईची उचल, ऊस दरासह विविध मुद्दे केंद्रस्थानी!
खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
दोन दिवसांपूर्वी 23 टक्के बस तिकीट वाढले, ऊस दराबाबत शेतकऱ्यांचे पंधरा दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे, पंचहमी योजनांमुळे सर्वच बाबतीत विकास बोंबलला, तर सर्व खाद्य पदार्थही गगनाला भिडले आहेत, असे असतांना सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारला याचे काहीच सोयसुतक नाही असा आरोप करत, आज (शुक्रवार 6) खानापुरात तालुका भाजपच्यावतीने बस रोको मोर्चाचे, आंदोलनाचे ‘अस्त्र’ उगारण्यात येणार आहे.
आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न!
चालू महिन्याच्या शेवटाला सरकारचे बेळगावात हिवाळी अधिवेशन होणार असून, यावेळी ते अनेक मुद्द्यांनी गाजण्याची चिन्हें दिसत आहेत, त्याचाच भाग म्हणून आजच्या खानापुरातील आंदोलनाने सुरवात म्हणावी लागेल. पंचहमी योजनांमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट ऐकू येत असल्याने विकासकामांचा टक्का पुरता घसरलेला दिसत आहे. एकही खात्यातील विकासकामांचा आलेख वाढतांना दिसत नाही. त्यामुळे हमी योजनांचा बराच फटका इतर गोष्टींवर झालेला दिसतो आहे, त्यामुळे तेच आयते कोलीत विरोधकांच्या हाती लागले असून, ती संधी सोडणे म्हणजे विरोधी भाजपसाठी मूर्खपणाचे ठरेल!
आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा…
आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा बस रोको होणार असून, तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानिकोप, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा भाजप उपाध्यक्ष संजय कुबल, राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, तालुका प्रधान सचिव मल्लापा मारिहाळ यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
प्रतिक्रिया –
केंद्रात भाजपचे सरकार असून, त्यांनी किती वस्तूंचे दर स्थिर केले, वाढती महागाई किती आटोक्यात आणली त्याचा पहिल्यांदा जनतेसमोर हिशेब ठेवावा. डिझेल -पेट्रोलसह अनेक वस्तूंचे दर गगनाला भिडलेले आहेत, असे असताना स्वतःची चूक लपविण्यासाठी भाजपचा हा खटाटोप आणि राजकीय स्टंट आहे, जनता शहाणी, सुज्ञ आहे, त्यांना सांगण्याची गरजच नाही.
– महादेव कोळी, तालुका काँग्रेस ग्रामीण ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष!

संपादक : विलास गोविंद कवठणकर





